कोरोना सर्टिफिकेटवरून ‘पब्लिक क्राय’

Foto

दुकानाचे शटर उघडायचे असेल तर कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केल्याने शहरातील व्यापारी संतप्त झाले आहेत. दुसरीकडे टेस्ट केल्यानंतर तातडीने सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था मनपाकडे नसल्याने गोंधळ उडाला आहे. कोरोना निगेटिव्हचे सर्टिफिकेट आत्ताच द्या अशी मागणी करीत अनेक केंद्रावर व्यापार्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. दरम्यान, प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांचा या संदर्भातील निर्णय मनपाच्या अंगलट येण्याची शक्यता असून कोरोना टेस्ट शिवाय उद्यापासून शहर अनलॉक होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दहा जुलैपासून लागू केलेल्या कठोर संचारबंदीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून शहरातील जीवन पूर्ववत होणार आहे. अशा परिस्थितीत काल मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यापार्‍यांसाठी नियमावली जारी केली. शहरातील प्रत्येक व्यावसायिकाला कोरोना टेस्ट बंधनकारक केली आहे. 
संसर्गाची साखळी तोडायची असेल तर या बाबी आवश्यक असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात किराणा दुकानदार, दूध, फळे, भाजीपाला, मटन, अंडी विक्रेत्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्याचा फतवाच मनपा आयुक्तांनी काढला आहे. 
आयुक्तांच्या या निर्णयाने आज शहरात गोंधळाचे वातावरण होते. आयुक्तांच्या या निर्णयाला व्यापार्‍यांनी जोरदार विरोध दर्शवला.  मनपाच्या अँटीजेन टेस्ट केंद्रावर व्यापार्‍यांनी एकच गर्दी केली. संतप्त व्यापार्‍यांनी मनपाच्या पथकावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 
सर्टिफिकेट तात्काळ द्या : दरम्यान, कोरोना टेस्टचे बंधन टाकलेल्या मनपाकडे कोणतेच नियोजन नसल्याचे उघड झाले. टेस्ट केल्यानंतर प्रमाणपत्र तात्काळ मिळत नसल्याने व्यापारी संतप्त झाले. टेस्ट केली आता तातडीने प्रमाणपत्र द्या, अशी मागणी व्यापारी करीत होते. मात्र मनपा पथकाकडे याबाबत कोणतीही यंत्रणा नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सर्टिफिकेट उद्या किंवा परवा मिळेल असे व्यापार्‍यांना सांगण्यात आले. मात्र व्यापारी ऐकायला तयार नव्हते. आम्ही दुकाने उघडणार कशी ? आता व्यापार्‍यांचा सवाल होता. एकंदरीत मनपाच्या या निर्णयावर  शहरात मोठा गोंधळ उडाला आहे.
व्यापारी महासंघ आयुक्‍तांना भेटणार
दरम्यान, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तातडीने मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.  कोरोना टेस्ट बंधनकारक करू नये, तो निर्णय व्यापार्‍यांवर सोडावा, अशी मागणी व्यापार्यांचे शिष्टमंडळ आयुक्तांकडे करणार आहे.  दुसरीकडे टेस्ट करण्यासाठी मर्यादित वेळ दिल्याने इतक्या कमी कालावधीत सर्व व्यापार्‍यांची तपासणी शक्य नाही, असा मुद्दाही व्यापारी आयुक्तांसमोर उपस्थित करणार असल्याचे समजते.
लॉकडाऊनच्या काळात का तपासले नाही ः मुकेश जैन
मनपा प्रशासनाने सर्व व्यापारी वर्गाला स्वॅब टेस्ट करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार टिव्ही सेंटर येथे जवळपास 500 व्यापारी आज सकाळी जमा झाले होते. व्यापार्‍यांनी शिस्तबद्ध रांग लावून टेस्ट करण्याची तयारी केली होती.  चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर स्वॅब टेस्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्यांनी मनपा कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता  ’सर्टिफिकेट देण्याचे आमच्याकडे कुठलीही व्यवस्था नाही, तुम्ही नंतर या’ असे त्यांना सांगण्यात आले.  त्यामुळे व्यापार्‍यांना मोठा मनस्ताप झाला असे जनरल मर्चंट असोसिएशनचे सदस्य आणि व्यापारी मुकेश जैन यांनी सांजवार्ताला सांगितले. जैन म्हणाले की, परिसरातील सर्व व्यापारी सकाळपासून रांगेत उभे आहेत. त्यात अनेक ज्येष्ठ व्यापार्‍यांचाही समवेश आहे. सर्टिफिकेटची कोणतीही व्यवस्था नसल्याचे समजल्यामुळे टेस्ट करून काहीच फायदा नव्हता. त्यामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला असेही जैन यांनी सांगितले. स्वॅब तपासणी केल्याशिवाय दुकान उघडू द्यायचे नाही हा निर्णय आधीच घेतला असता आणि लॉकडाऊन काळातच व्यापार्‍यांची आरोग्य तपासणी करून घेतली असती तर हा मनस्ताप झाला नसता, असेही त्यांनी सांगितले. सर्टिफिकेट असल्याशिवाय टेस्ट करून घेण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी केला. जर व्यापारी पॉझिटिव्ह आले तर त्यांना पुन्हा दुकाने बंद ठेवावे लागतील, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कॉरेंटाईन करतील. त्यात वेळ जाणार. ही प्रक्रिया जर आधीच केली असती तर खूप महत्त्वाचे काम सुलभपणे झाले असते असे ते म्हणाले.
निर्णयाचा फेरविचार करावा : संजय कांकरिया
  व्यापार्‍यांची कोरोना टेस्ट करण्याचा मनपा आयुक्तांचा निर्णय अन्यायकारक आहे. आता दुकाने उघडण्याची वेळ आल्यावर असा निर्णय का घेतला याचेच आश्चर्य वाटते.  टेस्टचा निर्णय वैयक्तिक असल्याने त्याची सक्ती करू नये, आदी मुद्दे आम्ही आयुक्तांसमोर मांडणार आहोत.